ताज्या अपडेट

बकरी ईदची सुरुवात कशी झाली...



प्रेषित मुहम्मदयांच्या पूर्वीचे हजरत इब्राहीम अलै सलाम हे एक पैगंबर होते. त्यांना वयाच्या नव्वदाव्या वर्षी मुलगा झाला. त्याचे नाव इस्माईल ठेवण्यात आले. प्रेषित हजरत इब्राहिम यांना खूप आनंद झाला आणि ते पत्नी आणि मुलांच्या प्रेमात व्यस्त झाले. त्यावेळी अल्लाहने त्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यावेळी स्वप्नात अल्लाहने त्यांना स्वत:ला जे सर्वात प्रिय आहे त्याची कुर्बानी देण्याचा आदेश दिला. तेव्हा त्यांनी प्रथम बकर्‍याची कुर्बानी दिली. दुसर्‍या दिवशी पुन्हा तेच स्वप्न, दुसर्‍या दिवशी त्यांनी मेंढा कुर्बान केला. तिसर्‍या दिवशी पुन्हा तेच स्वप्न, तिसर्‍या दिवशी उंटाची कुर्बानी दिली. चौथ्या दिवशी पुन्हा तेच स्वप्न. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, सर्वात प्रिय तर मुलगा इस्माईलच आहे. हजरत इब्राहिम अलै सलाम यांच्यासाठी ही कसोटीची वेळ होती. एकीकडे मुलावरचे प्रेम आणि दुसरीकडे अल्लाहचा हुकूम. प्राधान्य कुणाला द्यायचे. पण हजरत इब्राहीम अलै सलाम यांनी अल्लाहचा आदेश मानला आणि मुलाची कुर्बानी देण्याची मानसिकता केली. मुलाला घेऊन मक्कापासून मीनाकडे रवाना झाले. तेवढ्यात सैतान आला आणि त्यांनी हजरत इब्राहिम अलै सलाम यांची पत्नी हजरत हाजरा यांना त्या घटनेची माहिती देऊन अल्लाहच्या विरोधात भडकावण्याचा प्रयत्न केला. परंतु हजरत हाजरा यांनी अल्लाहच्या आदेशासमोर एक नाही तर हजारो इस्माईल कुर्बान केले असते, असे सांगून सैतानास सात वेळा कंकर मारून हाकलून दिले.

दुसरीकडे मीनाच्या मैदानावर हजरत इब्राहिम अलै सलाम पोहोचले आणि मुलाला विचारले, मी तुला अल्लाहच्या नावे कुर्बान करणार आहे, तुझे काय मत आहे, तेव्हा मुलगा हजरत इस्माईल अलै सलाम यांनी बाबा तुम्ही मला बिनधास्तपणे कुर्बान करा, माझे संयमी स्वरूप तुम्हाला पाहायला मिळेल असे सांगितले. तसेच बलिदानावेळी पुत्रप्रेम आडवे येऊन परमेश्वर कर्तव्यात अडसर येऊ नये, यासाठी पुत्र इस्माईल यांनी वडिलांना डोळ्यावर पट्टी बांधण्यास आणि स्वत:ला उलटे झोपवण्यास सुचवले. असे उत्तर ऐकताच हजरत इब्राहिम अलै सलाम यांनी तसेच काम करीत सुरी घेऊन मुलाची कुर्बानी देऊ लागले. तेवढ्यात देवदूत हजरत जिब्रिल आले आणि त्यांनी इस्माईल अलै सलाम यांना सुरीखालून काढले आणि सुरीखाली बकरीला ठेवले. बकरीवर सुरी फिरली आणि कुर्बानी झाली. त्यानंतर जिब्रिल अमीन यांनी हजरत इब्राहिम अलै सलाम यांना सांगितले की, तुमची कुर्बानी अल्लाने कबूल केली तुमच्या कुर्बानीवर अल्लाह खुश आहे. याच प्रसंगास अनुसरून परमेश्वरभक्ती, परमेश्वर प्रेमापोटी बलिदानाचे एक प्रतीक म्हणून ‘ईल-उल-अजहा’ साजरी केली जात आहे.

ईदचा दिनक्रम

१. सकाळी लवकर उठणे

२. मिस्वाक करणे (दात घासणे)

३. स्नान करणे

४. चांगले कपडे परिधान करावेत.

५. सुगंधी अत्तर लावणे.

६. ईदची नमाज ईदगाहमध्ये जाऊन अदा करणे.

७. ईदगाहला एका रस्त्याने जाऊन दुसर्‍या रस्त्याने परत येणे.

८. ईदगाहला जाताना पायी जाणे.

९. रस्त्यात जाताना तकबीर (विशेष प्रार्थना) म्हणणे.

१०. ईदच्या नमाजनंतर गरिबांना दान करावे.

११. ईदगाह येथे महिलांनाही आणावे.

कुर्बानी कुणाची द्यावी

कुर्बानी देण्यात आलेले जनावर परिपूर्ण तंदुरुस्त हवे. आजारी, अंध, अपंग, कान कापलेला नसावा. कुर्बानीच्या जनावरामध्ये एकही दोष नसावा. कुर्बानीनंतर जनावराची कातडी न विकता गरीब लोकांना द्यावी, अन्यथा मदरसामध्ये द्यावी.

बकरी ईदची सुरुवात कशी झाली... बकरी ईदची सुरुवात कशी झाली... Reviewed by Vijay Dole on 21:56 Rating: 5

No comments:

Theme images by sebastian-julian. Powered by Blogger.